WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!

प्रतिमा कुलकर्णी

प्रतिमा कुलकर्णी

ज्येष्ठ दिग्दर्शिका,  लेखिका, अभिनेत्री  प्रतिमा कुलकर्णी यांची माझ्या 'क्लोज एंकाउंटर्स ' या पुस्तकावर अतिशय संवेदनशील प्रतिक्रिया.. 

पुरू,

काल रात्री पुस्तक वाचून संपवलं. तू पाठवल्यावर लगेच सुरू केलं आणि भराभर वाचतही गेले, पण अचानक काही काम सुरू झालं आणि खंड पडला. राजम्मा पर्यंत येऊन खंड पडला होता. फार विषण्ण वाटत होतं. कदाचित म्हणूनच पटकन परत जाणं झालं नसाव. असो.

तू म्हणालास ते अगदी बरोबर आहे. तुझ्या पुस्तकाने.मला एका वेगळ्या आणि अनोळखी जगाची सफर घडवून आणली. त्याबद्दल तुझे खूप आभार. पुस्तक वाचून, नाटक बघून जगात अनेक प्रकारची माणसं आणि त्यांची अनेक प्रकारची आयुष्य असतात हे माहीत होते पण इतक्या जवळून नाही. इतक्या अंगांनी तर नाहीच.

पुस्तक फार सुंदर आहे असं म्हणवत नाही, तरीही ते तसं आहेच.

अस्सल, जिवंत माणसांचं जिवंत चित्रण आहे त्यात. फार प्रेमानी लिहिलं आहेस तू.  तुझी भाषा, शैली ही उत्तम आहेच, पण त्याही पेक्षा तुझी दृष्टी कमाल आहे.

ही सगळी माणसं तू लहानपणी पाहिली आहेस. तरीही त्या वयातही तुला त्यांचं मन कसं काय कळत होतं? आयुष्यात त्यांची नेमकी घालमेल काय आहे, विचार, भावना, आकांक्षा काय आहेत हे कसं काय कळत होतं? आणि नेमकं ते पकडुन तू इतक्या वर्षांनी त्यांच्या बद्दल कसं काय लिहू शकलास? प्रेम हे एक कारण आहेच, empathy हे आणखी एक कारण.

उत्तम लेखक व्हायला आणि काय लागतं?

ह्या पुस्तकाचा अभ्यास व्हायला हवा.

जयंत महणाला आहे तसं मला सारे प्रवासी घडीचे ची आठवण झाली. व्यक्ती आणि वल्ली आणि सारे प्रवासी घडीचे ही सगळ्यांचीच आवडती पुस्तकं आहेत.

पण तुझ्या पुस्तकात त्यांचं मन जसं दिसतं, त्यानी मला जास्त ढवळून  काढलं.

तू लेखी उत्तर दे महणालास ते बरच झालं. नुसतं बोलून समाधान झालं नसतं माझंही.

अशीच आणखी अनेक पुस्तकं तुझ्या हातून लिहून होवोत आणि आम्हाला आयुष्याचं दर्शन पुन:पुन्हा होत राहो ही सदिच्छा!!

Scroll to Top
">