दाहक सामाजिक दस्तावेज..
डॉ. प्रिया निघोजकर
मराठी साहित्यातल्या आत्मकथनांच्या परंपरेत साठच्या दशकानंतरची सत्त्वशील वाटेवरची प्रांजळ अभिव्यक्ती म्हणजे ‘काळ्यानिळ्या रेषा’ ही साहित्यकृती. राजहंस प्रकाशित या आत्मकथनपर साहित्यकृतीवर यंदा ‘साहित्य अकादमी पुरस्कारा’ची मोहर उमटली. राजू बाविस्कर लिखित हे पुस्तक केवळ चित्रकाराचं आत्मकथन नाही, तर तो संवेदनशील मनाचा, समाजातील एका वंचित वर्गाचा अस्वस्थ करणारा उद्गार आहे.
सन २०२२ मध्ये प्रकाशित या आत्मकथनात बाविस्कर स्वतःकडे नायकत्व घेत नाहीत, तर मनात सदोदित कृतज्ञतेचा भाव जपत आजवर जगलेल्या, भोगलेल्या आयुष्याचा पट संयतपणे आणि संवेदनशीलतेनं उलगडतात. स्वतःला शोधत जगण्यातलं तत्त्व, शाश्वत मूल्यं मांडतात. इथं भाषेचं तथाकथित शब्दसौष्ठव नाही, प्रातिभअलंकरण नाही; पण जगण्याशी संगत झालेले काळीज पिळवटून टाकणारे अनुभव मांडले आहेत.
एकूण ४२ लेखांमधून बाविस्कर यांनी आपल्या आजवरच्या दाहक जीवनप्रवासाची मांडणी केली आहे. व्यक्तिचित्रण आणि घटनाप्रसंगांच्या माध्यमातून समाजभान आणि आत्मभान यांची बेमालूम गुंफण त्यांनी यात साधली आहे. ‘माझे गाव – माझी वतनदारी’ इथपासून त्यांचा हा प्रवास सुरू होतो आणि ‘शिक्षण’ या शेवटच्या मुक्कामी पोहोचतो. चारशे सात पृष्ठसंख्या असलेली ही साहित्यकृती केवळ शब्दांची दुनिया नाही, तर रेखाचित्रांचीही आहे. प्रत्येक लेखात बाविस्कर यांनी चितारलेली भावचित्रे आहेत. वाचकानं चित्र पाहत वाचावं, आशय अंतरंगात मुरवत चित्रं निरखावीत आणि मग चित्रच वाचावं, असं याचं देखणं रूपडं आहे.
‘युगवाणी’चे संपादक असलेल्या प्रफुल्ल शिलेदार यांनी या पुस्तकाचं साक्षेपी संपादन केलं आहे; त्याशिवाय हे आत्मकथन लिहिण्यासाठी बाविस्कर यांना आत्मविश्वास दिल्यामुळे हा अस्सल पिळातून झंझावात वाचकांपर्यंत अनुभवांच्या उसळलेला मराठी पोहोचू शकला. एक नागरिक, एक कलावंत कसा घडत जातो त्याचे व त्याच्या भोवतीच्या समाजाचे मनोज्ञ दर्शन घडवणाऱ्या या आत्मकथनाची नोंद वसंत आबाजी डहाके, राजन गवस, ना. धों. महानोर, दीपक घारे अशा अनेक प्रतिभावंतांनीही घेतली आहे.
गावगाड्याचे दुःख, बलुतेदारी, ग्रामीण भागातलं कष्टमय जगणं, वेदना, कॅनव्हासवर चित्रातून रंगवतानाच आपल्या जळजळीत अनुभवाचं बाविस्कर यांनी यात मांडलं आहे. ‘काळ्यानिळ्या रेषा’ हे पुस्तकाचं शीर्षकही अन्वर्थक आहे. काळी रेषा वेदना, अंधार, अन्याय आणि उपेक्षेची, तर निळी रेषा आशा, स्वप्न, मोकळेपणा आणि अनंताचं प्रतीक म्हणून आपल्यासमोर मूर्त होते.
शाळकरी जीवनात बाविस्कर यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी, कुटुंबाला आधार देण्यासाठी अनेक वर्षं बँड पथकात काम केलं. बाविस्कर यांचा हा सारा अनुभव मुखपृष्ठापासूनच वाचकाच्या मनात ठसत जातो. या लेखनाची भूमी दाहक वास्तवाची आहे, वेदनेची आहे, तावूनसुलाखून निघालेल्या प्रगल्भ, संवेदनशील मनाची असल्यामुळे त्यात इतरांनाही चेतवण्याचं स्फुल्लिंग आहे. या आत्मकथनात त्यांचं ‘लासूर’ या जळगाव जवळील गावातलं बालपण, सामाजिक, सांस्कृतिक भवताल, कौटुंबिक परिस्थिती, वैयक्तिक संघर्ष यांचं चित्रण संयत आणि पण परिणामकारक शब्दांत आहे. कुठंही भावनिक उथळपणा किंवा कृत्रिम नाट्य नाही. ही मांडणी वाचकालाही जाणिवांच्या डोहात घेऊन जाते.
या लेखनाचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे येथील भाषेचा साधेपणा आणि मांडलेल्या अनुभवांची तीव्रता. अहिराणी मायबोलीचा त्यांनी चपखल वापर इथं केला आहे. बाविस्कर यांचं शिक्षण, रोजगार, सांस्कृतिक संघर्ष आणि अस्मितेचा प्रश्न या साऱ्यांचा सूक्ष्म संदर्भ यातून पुढं येतो; म्हणूनच हे आत्मकथन एका व्यक्तीपुरतं मर्यादित राहत नाही, तर व्यापक सामाजिक अनुभवाचं रूप धारण करतं. ‘काळ्यानिळ्या रेषा’ हे आत्मकथन वाचकाला अंतर्मुख करणारं आणि जीवनातील काळ्यानिळ्या रेषांमधला समतोल शोधण्याची प्रेरणा देणारं आहे. मराठी आत्मकथनपर वाङ्मयातील हे पुस्तक प्रामाणिक अनुभवकथनाचा महत्त्वाचा दस्तावेज आहे.
">
Skip to content