डॉ. शरद जावडेकर
‘सदविवेकवीण सर्व भांबावले,
रक्तपाती झाले ज्योती म्हणे!’
सुमारे दीडशे वर्षांपूर्वी जोतिराव फुले यांनी लिहिलेला हा अखंड आज डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून ते भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन, दुसऱ्याच्या अंगावर शाई फेकणाऱ्यांपर्यंत आणि दररोज फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेऊन बुवा-बाबांच्या नादी लागणाऱ्यांपासून ते बलात्कार करणाऱ्यांचा सत्कार करुन पेढे वाटणाऱ्यांपर्यंत सर्वांना लागू होतो. सध्याच्या काळात भारतात तंत्रज्ञानाचा जोमाने प्रसार होत आहे ही निश्चित स्वागतार्ह गोष्ट आहे; परंतु या तंत्रज्ञानाच्या प्रसारातून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्याऐवजी छद्म विज्ञानाचा प्रसार केला जातोय. संगणकीय कुंडलीसारखे प्रकार हा भारतीय जीवनाचा अविभाज्य भाग होत आहे, त्यामुळे भारतीय समाज हा विवेक हरवून बसला आहे का, अशी शंका वाटावी अशी सध्याची परिस्थिती आहे.
जगाला व भारताला आज विवेकाच्या जागराची नितांत गरज असतानाच डॉ. अभिजित वैद्य यांचा
‘विवेकयात्री’ हा ग्रंथ ‘राजहंस’ प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. हा ग्रंथ म्हणजे गेल्या पाच हजार वर्षांच्या ‘विवेकाच्या’ प्रवासाचा ललित भाषेत घेतलेला धांडोळाच. त्यामुळे हा ग्रंथ तत्त्वज्ञानाचा रूक्ष ग्रंथ न होता, वाचकांना प्रसन्न करणारा अनुभव देतो! मराठीच्या वैचारिक वाङ्मयात ही मोलाची भर म्हणावी लागेल. ५१९ पानाच्या या ग्रंथाची सुरुवात ५००० ते ६००० वर्षांपूर्वीच्या इजिप्तच्या संस्कृतीपासून होते. हा विवेकाचा पश्चिम पूर्वरंग आहे. विवेकाचा पश्चिमरंग ग्रीक तत्त्वज्ञान, सॉक्रेटिस यांपासून सुरू होऊन बटार्ड रसेल, सात्र, जॅक्स डेरिडा, नोअम चोम्स्की यांच्यापर्यंत येतो. पूर्वरंगात वेद, आस्तिक व नास्तिक दर्शने, संतपरंपरा, भारतातील प्रबोधनाचे युग याचा आढावा आहेच; पण इस्लाम आणि विवेकवाद हा भाग इस्लामाबद्दल गैरसमज बाळगणाऱ्या सर्वांचे डोळे उघडविणारा आहे. चिनी व जपानी विवेकयात्री यांचीही चर्चा याच प्रकरणात आहे. ‘विवेकाचा स्त्रीरंग’ व ‘विवेकाचा कृष्णरंग’ हीप्रकरणे वाचकांची दृष्टी जास्त व्यापक करतात. एकविसाव्या शतकातील नास्तिक तत्त्वज्ञ याची वाट पुसत लेखक वाचकांना वर्तमानात आणतात.
‘विवेकाच्या प्रकाशाची प्रतीक्षा’ हे शेवटचे प्रकरण विवेकाची अंतहीन यात्रा अधोरेखित करते. विवेकाचा संबंध एका बाजूने बुद्धिप्रामाण्यवादाशी व विज्ञानाशी, तर दुसऱ्या बाजूने तो इहवादी नैतिकतेशी आहे. माणसाचा इतिहास हा विवेक व अविवेक याच्या संघर्षाचा इतिहास आहे व हा प्रवास मंद गतीने चालू आहे. विवेकवाद हा ‘सिसिफसची शिळा’ ठरू नये, असे लेखकाला वाटते. विवेकवादी समाजासाठी धर्म व देव या संकल्पना नाकाराव्या लागतील, असा जळजळीत व निर्भीड निष्कर्ष लेखकाने काढला आहे. नव्या युगाचे नवे प्रश्न असले, तरी त्यासाठी विवेकवादाचीच आवश्यकता आहे, म्हणून विवेकवाद हे मानवी जीवनाचे चिरंतन मूल्य असल्याचे लेखक म्हणतो.
विवेकवादाचे तत्त्वज्ञान वैचारिकदृष्ट्या समृद्ध केले अशा सुमारे १७५ विवेकयात्रींच्या योगदानाचा हा आढावा आहे. यात काही व्यक्ती वगळल्या आहेत, याबद्दल मतमतांतरे होऊ शकतात, हे लेखकाने प्रस्तावनेत म्हटले आहे. विवेकवादी
तत्त्ववेत्याच्या तत्त्वज्ञानाचा आढावा घेताना, त्यांच्या चरित्राचा संदर्भ अनेक ठिकाणी आला आहे पण तो संदर्भ त्यांच्या जडणघडणीवर परिणाम करणार असल्यामुळे तो तेवढ्यापुरताच आहे !
पुस्तकाचे मुखपृष्ठ शेखर गोडबोले यांचे आहे. हा ग्रंथ ज्ञानकोश, तसेच ते इतिहासाचे पुस्तकही नाही; कारण विवेकवादाच्या प्रवासातील प्रत्येकाचा संदर्भ या ग्रंथात नाही. आणि इतिहास लेखनाप्रमाणे त्याची भाषा व मांडणीची नाही. मूळ विषयाशी तडजोड न करता ललित भाषेत केलेला ऊहापोह हेच या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. डॉ. वैद्य स्वतः हृदयरोग तज्ज्ञ असल्यामुळे समाजाच्या मेंदूच्या व हृदयाच्या निकोप आरोग्यासाठी त्यांनी लिहिलेला हा ग्रंथ फार मोलाचा आहे. हे पुस्तक चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या अभ्यासासाठी फार उपयुक्त आहे; तसेच ते प्राध्यापकी पेशात येणारे कोणत्याही शाखेच्या नव्या उमेदवारांना शिक्षणाची वैचारिक बैठक तयार करण्यासाठी उपयुक्त आहे.
">
Skip to content