‘वि.ग.कानिटकर‘ यांच्या निवडक साहित्याचा वेध घेणारा महत्त्वपूर्ण ग्रंथ- ‘ अक्षरछाया ‘ हा ग्रंथ राजहंस प्रकाशनाने नुकताच प्रकाशीत केला आहे…
त्यातील लेख ..
प्रिय वि. ग.,
तुम्ही श्री.गं.शी आणि ‘माणूस’शी घट्ट जोडले गेला होतात. माझ्या आठवणीनुसार दि. बा. मोकाशींनी तुमच्या दोघांची गाठ घालून दिली होती. तुमचं मैत्र जुळलं..
तुम्ही स्वतः ‘माणूस’ मध्ये चौफेर लिहीत होतात. ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले’, “वधस्तंभावरील आवाज’ अशा तुमच्या लेखमाला हळूहळू वाचकांचं लक्ष वेधून घेत होत्या. ‘माणूस’च्या दिवाळी अंकातील ‘धन्य तूचि कांता’ काय किंवा ‘मी तुळस तुझ्या अंगणी’सारख्या मध्यमवर्गीय स्त्री वाचकांत मोठ्या प्रमाणात वाचल्या गेलेल्या दिवाळी अंकातल्या पुरवण्या काय, या तुमच्या कल्पक विचारातून तयार झाल्या आणि गाजल्या.
अशा या तुम्हा दोघांच्या धडपडीच्या पार्श्वभूमीवर श्री.गं.नी एक दिवस तुमच्या हातात विल्यम शिररचं ‘राईज अँड फॉल ऑफ थर्ड राईश’ हे पुस्तक ठेवलं आणि पुढे चमत्कार झाला. श्री.ग. घरी सांगायचे, ‘सुरुवातीला ‘नाझी’ लेखमालेला कोमट प्रतिसाद होता; पण जसा #हिटलर आक्रमक होऊ लागला, धक्का देणाऱ्या चाली खेळू लागला आणि युद्धाची ठिणगी पडली, तेव्हा ‘नाझी’ लेखमालेनं उचल खाल्ली. वाचकांच्या मनाची पकडच घेतली.’
आज विचार करताना वाटतं ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’ हा ग्रंथ तुमच्या, ‘माणूस’च्या आणि श्री.गं.च्या वाटचालीत एक सुंदर अपघात होता. विल्यम शिरर यांचं पुस्तक श्री. गं.च्या हाताला लागतं काय, ते तुम्हाला त्याच्या आधारे दुसऱ्या महायुद्धावर लिहायला सांगतात काय आणि तुम्ही सुरुवातीला त्याचा आधार घेऊन नंतर नंतर इतर असे पुस्तकांच्या वाचन-मननातून लेखनाची स्वतःची वेगळी वाट काढता काय, मला आजही हा मोठा चमत्कार वाटतो. पन्नास वर्षं झाली, जवळपास तीस आवृत्त्या झाल्या, तरी आजही ‘नाझी’ची वाचकप्रियता टिकून आहे या स्वरूपाच्या राजकीय महापुरुषांच्या चरितकहाण्यांची वाट तुम्ही मराठीमध्ये शोधून काढलीत, हे निर्विवाद सत्य.
मला त्या वेळी जाणवलेलं तुमचं एक वेगळेपण सांगतो. तुम्ही ‘नाझी’च्या यशात कधी अडकला नाहीत. यश डोक्यात जाऊ दिलं नाही. इतक्या वर्षांत मी तुम्हाला ‘नाझी’बद्दल कौतुकाचं बोलताना कधी ऐकलं नाही. तुम्ही लगेच दुसऱ्या विषयाकडे वळलात. तुम्ही चीनच्या राज्यक्रांतीचा इतिहास सांगणारा ग्रंथ लिहायला सुरुवात केली. या ग्रंथाबद्दल एक आठवण सांगतो. त्याच सुमारास अरुण साधूंची चीनच्या स्वातंत्र्यलढ्यावरची ‘आणि ड्रॅगन जागा झाला’ ही लेखमाला ‘माणूस’मधून सुरू झाली होती. साहजिकच पुढे
पुस्तक ‘राजहंस’तर्फे प्रकाशित झालं. त्याच सुमारास तुमचं पुस्तक तुमचे मित्र बाबूराव इनामदार यांनी प्रकाशित केलं.
एका विषयावरची ही दोन पुस्तकं थोड्याफार अंतराने प्रकाशित झाली होती. पण वाचक आणि समीक्षकांचं झुकतं माप साधूंच्या पारड्यात पडलं. त्या काळात तुमचं ‘माणूस’मध्ये येणं होत असायचं. ‘माणूस’ मध्ये लिहीतही होतात. भेटीत आपल्या सगळ्यांच्या गप्पाही नेहमीसारख्या होत होत्या, पण आतून तुम्ही थोडे नाराजही होता. बोलताना सहज दाखवल्यासारखं साधूंच्या पुस्तकातील उणिवा, त्याच्या गृहीतकातल्या त्रुटी दाखवत होतात. त्याच वेळी बहुधा ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये दोन्ही पुस्तकांचं एकत्रित परीक्षण आलं. त्यात दोन्ही पुस्तकांची एकूण भलावण केली होती. दोघांच्या लेखनगुणांचं कौतुकही होतं, पण जाता जाता ‘साधूंच्या लेखनात नवखेपणा जाणवत असला, तरी माओच्या नेतृत्वाचं नेमके आकलन साधूंना अधिक झाल्याचं आणि कानिटकरांच्या लेखनात सफाई अधिक असल्याचं लिहिलं होतं.’ या शेरेबाजीमुळे तुम्ही दुखावला होता. हे तुमच्या नंतरच्या काही महिन्यांच्या भेटीत जाणवलं. खरं तर त्या वेळी तुम्ही एक मान्यताप्राप्त लेखक होतात. ललितलेखक म्हणूनही तुमचं नाव झालेलं होतं. ‘नाझी’चं झळाळतं यश तुमच्या मागे होतं. तुलनेनं साधू लेखनक्षेत्रात नवा होता. तोवर त्याचं नाव झालेलं नव्हतं. त्याच्या कौतुकानं तुम्ही इतकं नाराज होण्याचं कारण नव्हतं पण तुम्ही झालात.
हा तुमचा स्वभाव होता. अर्थात प्रत्येकाचा एक स्वभाव असतो. त्यात अनेक रंगीबेरंगी छटा असतात. काही रंग डोळ्यांना सुखावतात. काही खुपतात. तुमच्या स्वभावात डोळ्यांना सुखावणारे रंग अधिक होतेच. सतत दुसऱ्याला मदत करणं, उपयोगी पडणं, हे तर होतंच. कोणाला नोकरी लावून दे, कोणाला जागा मिळवून दे, कोणाचं लग्न जमवून दे, कोणाला अडचणीत पैसे दे अशा गोष्टी तुम्ही अगदी सहज करायचात. प्रसंगी झीज सोसून करायचात. पण तुमच्यात एक अतिसावध व्यवहार होता. त्या व्यवहाराचं टोक अनेकदा समोरच्या व्यक्तीला टोचायचं. तुम्हीच म्हणायचा, ‘मला समोरच्या माणसाच्या डोळ्यांच्या बाहुल्या नेहमी उलट्या दिसतात’.
अपत्य. ‘नाझी’पेक्षाही अधिक. ‘नाझी’नं तुम्हाला ओळख दिल्ली नाव दिलं, मान आणि प्रतिष्ठा दिली; पण ‘लिंकन तुम्हाला हृदयातून भिडला, हे सत्य.
अखेरची तीन-चार वर्ष सोडली तर एरवी तुम्ही अखंड लिहीत होतात, वाचत होतात, कात्रणं काढत होतात, टिपणं काढत होतात, नवी-जुनी पुस्तके ज्या करत होतात. अभ्यासकांना ती देत होतात. तुमची स्वतःची लायब्ररी दृष्ट लागावी अशी देखणी. सविस्तर नोंदींसह शिस्तशीर लावलेली. तुम्ही स्वतः एक प्रतिष्ठान काढलं. केवळ लेखनावर मिळवलेले पैसे त्यात ठेवले. अनेक छोट्या-मोठ्या संस्थांना तुम्ही देणग्या दिल्यात. त्याची वाच्यता केली नाहीत. शांतपणाने हे काम केलंत. हे तुमचं फार मोठं काम होतं. मराठीत हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच लेखकांनी हे केलं आहे.
प्रकृतीनं तुम्हाला साथ दिली असती, तर तुमचा हा वाचन-लेखन यज्ञ असाच अखेरच्या दिवसापर्यंत चालू राहिला असता पण मध्यंतरी तुमची प्रकृती बिघडली. लहानमोठे आजार मागे लागले. त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट महणजे नंदू-उषाची आई, ‘बाई’ गेल्या. बाई गेल्या आणि तुम्ही अक्षरशः खचालात..
इतकी वर्षे तुमच्या घरातून एखाद्या मिश्कील टिपणीवर हसत हसत बाहेर यायचो, त्याच घरातून निराशेचे सूर ऐकत बाहेर यायची वेळ आली होती. मात्र माझ्या आयुष्याच्या पानांवर कितीतरी आठवणींच्या रूपानं तुम्ही आधीच एक स्वतंत्र अध्याय लिहून ठेवला होता. ‘नाझी’ अन् ‘लिंकन’ सारखे मोठे प्रकल्प असोत, ‘माणूस’मध्ये राबवलेले अनेक उपक्रम असोत किंवा स्कूटरच्या दोन किल्ल्या बनवून एकाआड एक वापरण्याची अथवा प्रत्येक खोलीत स्वतंत्र चष्मा ठेवण्याची तुमची गमतीदार सवय असो-तुमच्या शैलीसारखा तुमचा स्वभाव रंगीबेरंगी होता. तुमच्या अध्यायाची ही पानंही तशीच बहुरंगी होती.
अखेर एक दिवस सारं थांबलं.
तुम्ही गेलात.
माझ्या आयुष्यातला पन्नास वर्षाचा ‘कानिटकर अध्याय’ संपला.
दिलीप माजगावकर
#हिटलर
#Israel #America #USA #WorldWar #IsraelIran #Lebanon #USIRAN #WorldWar3 #War #मराठी #मराठी #इतिहास
">
Skip to content