पद्मभूषण #शकुंतलापरांजपे !
#कुटुंबनियोजन क्षेत्रात अनन्यसाधारण कार्य केलेल्या #समाजसेविका शकुंतलाबाई परांजपे यांची आज जयंती..
या निमित्त लेख..
#पुणे शहराच्या मातीलाच सात्त्विक गुणांचा सुगंध परंपरा लाभलेले पुणे शहर ओळखले जाते ते तेथील प्रज्ञावंतांच्या अद्वितीय कार्यामुळे. संतती नियमनाचे पायाभूत कार्य करणाऱ्या लेखिका व नाटककार शकुंतला परांजपे यांच्या एकूण लिखाणाचा वेध घेणारे ‘निवडक शकुंतला परांजपे’ या पुस्तकाचा थोडक्यात परमर्श.. विनया खडपेकर यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे.
स्त्रियांच्या भोवताली अनेक प्रश्न असतात कधी धर्माचे तर कधी तिच्या वैवाहिक जीवनाचे… शकुंतला परांजपे यांनी मात्र अनेक पाशांचे अस्तित्व नाकारले होते.. रँग्लर परांजपे या सुधारक वडिलांच्या घरात त्यांचा जन्म झाला. पुढे परदेशात जाऊन केंब्रिजची ट्रॉयपॉस परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. त्या काळी ‘रँग्लर’ ही बहुमानाची पदवी केवळ पुरुषांसाठी होती.. नाहीतर शकुंतलाबाईंनादेखील ही उपाधी असती. रूढींनी ग्रासलेल्या समाजात परिवर्तन आणण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य वाहून घेतलं. रूढींचा त्रास त्यांना व्हायचा का.. तर माझ्या मते नक्कीच होत असे.. पण त्यांनी तो कधी मानलाच नाही.. तर इतर स्त्रियांवर लादलेले अनावश्यक नियम व रूढी यातून त्यांची सुटका व्हावी यासाठी त्यांनी विपुल लेखन केले. त्यांचे इंग्रजीतील ‘सेन्स अँड नॉनसेन्स’ हे पुस्तक म्हणजे त्याचाच एक भाग होय. त्यांच्या काळी स्त्रीशी वागण्याची समाजाची रीत शकुंतलाबाईच्या लेखनात अगदी निर्हेतुकपणे आली आहे. तुम्ही त्यांचं फक्त ‘निवडक शकुंतला परांजपे’ वाचा.. त्यावरून तुम्हाला त्यांच्या स्वच्छंदी, संवेदनशील आणि तेवढ्याच विनोदी स्वभावाचा अंदाज येईल. ‘माझी प्रेतयात्रा’ या लेखात स्वतःला दिसलेल्या प्रेतयात्रेच्या शोकसभेचे गमतीदार वर्णन शकुंतलाबाई करतात.. या लेखातून त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीचा नेमका अंदाज बांधता येतो.. या लेखाची शैली ओघवती असली आणि विनोदी बाज असला.. तरी त्यामागे भावनांची केवढी गुंतागुंत आहे, स्त्रीच्या भोवती आवळलेल्या नियमांची चौकट किती घट्ट आहे हे लक्षात येतं.
मनमोकळ्या स्वभावाच्या शकुंतलाबाई कधीही कुणाशी तडजोड करत नाहीत.. त्या काळी सुरुवातीला त्यांनी #प्रभात च्या सिनेमांतून काम केलं.. त्यावर ‘ते काही फार विशेष नव्हतं’ असं त्या सहज सांगतात… शकुंतलाबाईंचं भाग्य केवढं थोर की त्या आठ नऊ वर्षांच्या असतानाच हरी नारायण आपटे यांनी ‘भासकवीच्या नाटककथा’ हे पुस्तक त्यांना अर्पण केलं. पुढे याच शकुंतलाबाई थोर विदुषी झाल्या.. संतती नियमन हेच आपलं ध्येय मानलं. राज्यसभेच्या खासदार झाल्या. त्यांना पद्मभूषण मिळालं! आपले वडील रँग्लर परांजपे आणि मुलगी सई परांजपे या दोघांची व्यक्तिचित्रे वाचावीत ती केवळ शकुंतलाबाईंकडूनच. सईला त्या प्रेमाने स्वारी’ म्हणत.. या तिघांची एकमेव आठवण म्हणजे ‘पुरुषोत्तमाश्रम’ हा बंगला होय…. सईताईच्या भेटीच्या निमित्ताने मी अनेकदा तिथे जात असे.. बंगल्यावर व भोवताली मी निरखून नजर फिरवत.. त्या क्षणी मला हे तिघेही एकमेकांशी बोलत असल्याचा भास होत असे.. यातील चित्रकथा व व्यक्तिस्मरणे अनेकदा त्यांच्या साहित्यातून वाचायला मिळतात.. ‘घराचा मालक’ हे पुस्तक म्हणजे त्याचं बोलकं चित्र आहे. शकुंतलाबाई लोकमान्य टिळक व गोपाळराव जोशी यांच्याशीही नातं सांगतात.. त्यांची आई ही गोपाळराव जोशी यांची पुतणी.. महर्षी कर्वे व रँग्लर परांजपे हे सख्खे आतेमामेभाऊ.. त्यामुळे ओघानेच र.धों. कर्वे यांचे कार्य बाईनी पुढे नेले. काळाच्या कितीतरी पुढे विचार करणाऱ्या या क्रांतिकारी सामाजिक कार्यकर्त्या होत्या.
#अभिनेत्री, नाटककार, #लेखिका अशा कित्येक उपाध्यांनी त्या आपल्याला विविध रूपात भेटतात. विनोद हा तर त्यांचा स्थायिभावच होता.. राजहंसने (राजहंस प्रकाशन) त्यांच्यावर केलेले ‘निवडक शकुंतला परांजपे’ पुस्तक म्हणजे वाचकांसाठी एक मनमोकळ्या #गप्पा आहेत.
संपादक विनया खडपेकर म्हणतात, ‘त्यांचा काळ मागे पडला असला तरीही हे लिखाण वाचकांना आकषून घेणारं आहे.’ सई परांजपे यांच्या सहवासातून कित्येकदा मला स्वतःला शकुंतलाबाई भेटतात.. कुठेही प्रकाशित न झालेले अनेक किस्से मी ऐकलेत.. शकुंतलाबाई हे न उलगडणारं गोड कोडं आहे.. तुम्ही जेवढं त्याच्या मुळाशी जाल.. तेवढे तुम्ही समृद्ध नक्कीच व्हाल.. या पुस्तकाच्या अखेरीस विनया खडपेकर यांनी घेतलेली शकुंतला परांजपे यांची मुलाखतदेखील खूप बोलकी आहे.. आवर्जून वाचावे असे हे #पुस्तक आहे.
#marathi_status_ #मराठी #मराठीनाटक #समाजसेवी
स्वप्निल जोशी swapnilkashi566 @gmail.com
संपर्क : ९७६६१२९०१५
">
Skip to content